तू फक्त माझं झाड माझ्यावरल उन काढ
मी तुझा तारा नाही मला बघून दिशा ठरव
मी तुझा वारा नाही भिरभिर माझ्यामध्ये हरव
उधाणलेला समुद्र असेन पण तुझा किनारा नसेन
लाटांवरती स्वार हो माझ्यावरून पार हो
तुझ्यामध्ये भिजून उभा तसाच उभा राहीन मग
तू मात्र चालत रहा तू मात्र पुढेच बघ
अशीच असते गोष्ट खरी असच असत खर जग
मला तुझा शेवट नाही अस कस म्हणू सांग
आठवण आठवण आठवण आठवणींची लांबच रांग
अशा कितीक गोष्टी आणि अशा कित्येक रांगा
असे कित्येक किनारे आणि अशा कित्येक बागा
मीच माझा तारा तरी मलाच माझी दिशा नाही
मीच माझा वारा आणि भिरभिरणारा पाचोळा हि
उधाणलेला समुद्र मी पण खरच किनारा म्हणजे काय
अजून आहेत माझ्या वरती कितीक ठसे कित्येक पाय
मी थकून थकून जातो पायाखालचा रस्ता होतो
वाटेत एखाद झाड भेटत सावली मधून अंगाला खेटत
पण पुढे प्रवास तसाच असतो एकच पक्षी उडता दिसतो
चोचीमध्ये गाण असत पंखावर उन नसत
फ़क़्त काळजावरल्या खुणा सांगत राहतात पुन्हा पुन्हा
ते फ़क़्त तुझं झाड तुझ्या वरल उन काढ
तू फ़क़्त माझा झाड माझ्यावारलं उन काढ
- सौमित्र (तरीही)