शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

शाळा आठवतीये मला...

शाळा आठवतीये मला,
रेल्वे च्या पुलापासून ते गुलमोहराच्या झाडापर्यंत...
सरांच्या रठ्यांपासून ते म्याडमच्या लाडपर्यंत...
पटांगण ते थेट पाण्याच्या टाकीपर्यंत...
पांढरा फटक शर्ट ते गुढग्या इतक्या खाकीपर्यंत..

शाळा आठवतीये मला,
इंग्रजी च्या ग्रामर पासून, बीज गणिताच्या सुत्रा पर्यंत...
ई. भू. ना. आणि शस्त्रापासून, नाटकातल्या पात्रा पर्यंत...
मराठीच्या अभंगा पासून ते कलेच्या रंगा पर्यंत...
गंधक आणि पाऱ्या  पासून ग्रह आणि ताऱ्या पर्यंत... 

शाळा आठवतीये मला,
बुवाच्या प्याटीस पासून  ते जगतापच्या वड्या पर्यंत...
चिंचा आवळे बोरांपासून सरबतच्या गाडीपर्यंत...
मैत्रिणी च्या गप्पांपासून, चुगल्या अन खोड्यांपर्यंत
मित्राच्या टपली पासून अगदी पार राड्यापर्यंत'

शाळा आठवतीये मला,
फळ्या पासून ते शेवटल्या बाकापर्यंत...
छातीतली धक धक आणि 'ती'च्या चाफेकळी नाकापर्यंत...

शाळा अशीच आठवत  रहाणार मला,
'अ' पासून 'ज्ञ' पर्यंत आणि माझ्यातला "मी' असे पर्यंत... 
------------------------------------------------------| प्रशांत ठाकूर |  "मनातल्या मनात" |