शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

आजही घडतंय महाभारत आणि वस्त्रहरण

माझ्या महा'न' भारतात पुन्हा पुन्हा महाभारत घडतंय. १०० आणि त्याहून अधिक वाईट वृत्ती आणि प्रवृत्ती बरोबर लढणारे ५ आणि त्याहीपेक्षा कमी प्रमाण झालेले चांगल्या वृत्ती आणि प्रवृत्ती. खरच दयनीय झालो आहोत आम्ही. आज मला अखंड भारत वर्ष त्या मयसभेतल्या बघ्यानसारखा भासतोय ज्या मयसभेत द्रोपदीच वस्त्र हरण झाल होत. युगानुयुगे उलटून गेली तरी तेंव्हाही 'स्त्री' असुरक्षित होती आणि ती आजही असुरक्षितच आहे. त्यावेळी कौरव १०० होते आज प्रत्येक गल्ली बोळात १०० विकृतींचे कौरव आहेत. पांडव तेंव्हाही निष्क्रिय होते आणि आजही आमच्यातल्या चांगल्या प्रवृत्तीची माणस निष्क्रिय भासत आहेत. धृतराष्ट्रा सारख आंधळ सरकार, गांधारी सारख डोळस पण डोळ्याला पट्टी बांधलेली न्याय व्यवस्था, मयसभेत घडत असलेल सगळ थांबवता येईल इतकी ताकद असलेले पण आंधळ्या सरकारच्या मर्जीत असलेले भीष्म पितामह म्हणजे आजची प्रशासन व्यवस्था. आजच्या प्रत्येक स्त्रीला म्हणजेच ह्या महा'न' भारतातल्या आजच्या द्रोपदीला आजही तेच भोगाव लागतंय, आजही तीच शोषण होतंय, आजही तिला ह्या मयसभेत नागव करायला शंभराहून अधिक हात आसुसलेत. त्या द्रोपदीला वस्त्र हरणापासून वाचवणारा कृष्ण मात्र आजच्या द्रोपदीला कुठे दिसत नाहीये..शून्यात नजर लावून बसलेली आजची द्रोपदी खरच एका कृष्णाची वाट पाहत आहे. कृष्णा ने चांगल परिवर्तन घडवून आणल आज गरज आहे परिवर्तनातून कृष्ण निर्माण करण्याची. --प्रशांत ठाकूर

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

शाळा आठवतीये मला...

शाळा आठवतीये मला,
रेल्वे च्या पुलापासून ते गुलमोहराच्या झाडापर्यंत...
सरांच्या रठ्यांपासून ते म्याडमच्या लाडपर्यंत...
पटांगण ते थेट पाण्याच्या टाकीपर्यंत...
पांढरा फटक शर्ट ते गुढग्या इतक्या खाकीपर्यंत..

शाळा आठवतीये मला,
इंग्रजी च्या ग्रामर पासून, बीज गणिताच्या सुत्रा पर्यंत...
ई. भू. ना. आणि शस्त्रापासून, नाटकातल्या पात्रा पर्यंत...
मराठीच्या अभंगा पासून ते कलेच्या रंगा पर्यंत...
गंधक आणि पाऱ्या  पासून ग्रह आणि ताऱ्या पर्यंत... 

शाळा आठवतीये मला,
बुवाच्या प्याटीस पासून  ते जगतापच्या वड्या पर्यंत...
चिंचा आवळे बोरांपासून सरबतच्या गाडीपर्यंत...
मैत्रिणी च्या गप्पांपासून, चुगल्या अन खोड्यांपर्यंत
मित्राच्या टपली पासून अगदी पार राड्यापर्यंत'

शाळा आठवतीये मला,
फळ्या पासून ते शेवटल्या बाकापर्यंत...
छातीतली धक धक आणि 'ती'च्या चाफेकळी नाकापर्यंत...

शाळा अशीच आठवत  रहाणार मला,
'अ' पासून 'ज्ञ' पर्यंत आणि माझ्यातला "मी' असे पर्यंत... 
------------------------------------------------------| प्रशांत ठाकूर |  "मनातल्या मनात" |

मंगळवार, १५ मे, २०१२

"नशिबाचा खेळ"...'?'

देव म्हणे परीक्षा घेतो आपली...मी म्हंटल देवाला, 
" घे बाबा परीक्षा, पण विषय कुठला? अभ्यासक्रम काय? तारीख-वार -वेळ?"
काहीतरी कळून द्याव न आधी...पण ते नाही पटत ना बाप्पाला...
सगळच अचानक कळल्यावर बावरतो ना राव आम्ही...
आमचे होतात हाल, आणि तुम्हीं म्हणता "नशिबाचा खेळ"...'?'

शनिवार, १२ मे, २०१२

देव शोधून थकलो आम्ही

देव शोधून थकलो आम्ही, देव नाही, आणि देवपणहि नाही,
संत म्हणून गेले, 'देव माणसात शोधावा' 
म्हंटल माणूस शोधून पाहावा
पण अंती कळले माणूस हि उरला नाही,
आणि जो उरला; त्याला माणुसकीच कळली नाही... -(प्रशांत ठाकूर)

शुक्रवार, ११ मे, २०१२

किनारा सोडून फार खोलवर आलोय


किनारा सोडून फार खोलवर आलोय, खरच थकलोय फार हि नाव वल्हवून...
शांत बसलोय आता, प्रवाह नेहील  तिकडे जाण्याची मानसिक तयारी ठेऊन...
सगळच माझ्या हातात असताना, मोकळाही झालोय वर बोट दाखवून... - ( प्रशांत ठाकूर)

मंगळवार, १ मे, २०१२

महाराष्ट्र दिन

१ मे १९६०, 'बॉम्बे' हे राज्य भाषांवार तत्वावर  विभागले गेले आणि त्यातून दोन राज्यांची निर्मिती झाली, महाराष्ट्र आणि गुजरात. 'बॉम्बे स्टेट', कोंकण प्रांत, विदर्भ आणि मराठवाडा हे प्रांत मिळून एक महाराष्ट्र निर्माण केला, सहजासहजी नाही तर असंख्य बलिदानातून ह्या महाराष्ट्राची निर्मिती झाली तो हा आजचा दिवस महाराष्ट्र दिन साजरा केला जातो...खर तर हा उत्सव बलिदानाचा...